nagpur corporation cancelled special meeting 
nagpur corporation cancelled special meeting  
नागपूर

तुकाराम मुंढेंनी काढली पालिकेच्या विशेष सभेची हवा

सरकारनामा ब्युरो

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना 'नियमांचे डोस' पाजण्यासाठी काल गुरुवारी बोलावण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आली. आयुक्तांनी मुदतीत अर्थसंकल्प सादर केला नसल्याने त्यांना घेरण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ मागून सभेची हवाच काढून टाकली.

नियमांवर बोट ठेवून आयुक्तांनी अनेक विकासकामे थांबवली आहेत. महापौरांच्या हस्ते ऐवजदारांना नियुक्तिपत्र वाटपाचा सोहळासुद्धा रद्द करायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. दलित विकास निधी रोखण्यात आल्याचाही भाजपचा त्यांच्यावर आरोप आहे. इतरांना नियम सांगणारे आयुक्त स्वतःच नियम पाळत नसल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यांना नियमांची जाणीव करून देण्यासाठी भाजपने विशेष सभा बोलावली होती. मनपाच्या नियमानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेचा प्रस्तावित आणि सुधारित अर्थसंकल्प सादर करणे आवश्‍यक असतो. मात्र, पाच मार्चपर्यंत तो सादर केलेला नव्हता. याची आठवण करून देण्यासाठी त्यांना स्थायी समितीच्या 11 सदस्यांनी पत्रसुद्धा दिले होते.

आयुक्तांना नियमांवर बोट ठेवून घेरण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली होती. विशेष सभा बोलावण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसताच आयुक्तांनी स्थायी समितीला पत्र पाठवून अर्थसंकल्प सादर करण्यास वेळ मागितली. तसे लेखी पत्रही दिले. सभा असल्याने कालपर्यंत त्यांना सत्ताधाऱ्यांनी वेळ दिली नाही. विशेष सभेनंतर वेळ देण्यात यावी, असे सुरुवातीला ठरवण्यात आले होते. मात्र, आज अचानक सत्ताधाऱ्यांनी निर्णय बदलला. विशेष सभाच रद्द केली. अर्थसंकल्प सादर करण्यास आयुक्तांनी तयारी दर्शवल्याने सभा रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT